नवी दिल्ली – कॅन्सरचे औषध बनवणाऱ्या भारतीय कंपनीला मोठा झटका बसला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅन्सरची औषधे बनवणारी कंपनी फ्रेजेनियस काबी अन्कोलॉजी लिमिटेड (एफकेओएल) कंपनीला 50 मिलियन डॉलर (368 कोटी रुपये ) दंड भरावा लागणार आहे. कंपनीच्या पश्चिम बंगालमधील प्लांटचे निरीक्षण करण्यास आलेल्या अमेरिकेच्या एफडीएच्या अधिकाऱ्यांपासून कंपनीने काही रेकॉर्ड लपवले तर काही नष्ट केले. कंपनीने आपली चूक मान्य केली आहे.
लास वेगास येथील फेडरल कोर्टात कंपनीने एफडीएच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे मान्य केले. एफडीएच्या अधिकाऱ्यांना काही रेकॉर्ड देण्यास आपण असमर्थ ठरलो असून फेडरल फूड, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टचे आपण उल्लंघन केल्याची कबुली दिली. तसेच आपल्या या गुन्ह्याबाबत 30 मिलियन डॉलरचा फौजदारी दंड आणि 20 मिलियन डॉलरचा दंड भरण्यास तयारी दर्शवली.