मुंबई – उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने नुकताच जाहीर केला. विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई येथे याबाबत माहिती देताना गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीसाठी पक्षाची तृणमूल काँग्रेस व काँग्रेससोबत चर्चा सुरु असल्याचं सांगितलं.
यावेळी पवार यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबाबतीतही भूमिका मांडली. उत्तर प्रदेशात पक्ष समाजवादी पक्ष व इतर मित्र पक्षांसोबत आघाडी करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
“निवडणुकांच्या तोंडावर उत्तर प्रदेशात धार्मिक आधारावर ध्रुवीकरण केले जात असून जनता याला योग्य उत्तर देईल. उत्तर प्रदेशातील जनतेला बदल हवा असून निवडणुकांनंतर राज्यात बदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल.” असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
“मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे ४ आमदार होते. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून निवडणूक लढण्याबाबत चर्चा झालीय. मणिपूरमध्ये आम्ही एकूण ५ ठिकाणी निवडणूक लढू.” अशी माहिती देखील शरद पवार यांनी यावेळी दिली.