डोंबिवली – ताडीचे अतिसेवन केल्याने दोन तरुणांचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात कोपर परिसरात घडली आहे. सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके अशी दोन मयत तरुणांची नावे आहेत. स्वप्नील चोळके हा डोंबिवली शहर वाहतूक विभागात वॉर्डन म्हणून कार्यरत होता, मात्र दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुट्टीवर होता. विष्णू नगर पोलिसांनी या प्रकरणी ताडी विक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ताडी विक्रेता रवी भटनी याचा शोध सुरु केला आहे. सचिन पाडमुख आणि स्वप्नील चोळके हे दोघे काल सायंकाळी आपल्या मित्रांसह कोपर गाव रेल्वे रुळालगत असलेल्या ताडी सेंटरवर ताडी पिण्यासाठी गेले होते. नऊ वाजण्याच्या सुमारास सचिन पडमुख, स्वप्नील चोळके घरी परतत असताना रस्त्यात त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांच्या मित्रांनी दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या दोघांचा मृत्यू ताडीचे अतिसेवन केल्याने झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे विष्णुनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भालेराव यांनी सांगितले.