अमोल गायकवाड
जुन्नर – जुन्नर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता दिसून येत असून, याबाबतची चर्चा चौकात व समाजमाध्यमांमध्ये रंगत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप व कॉंग्रेस हे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. याचबरोबर मनसे, रिपाइं, एमआयएम आणि इतर छोट्या पक्षांबरोबरच अपहिी गुडघ्याला बागि बांधून तयार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत रंगतदार लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पक्षाची ताकद व वैयक्तिक हितसंबध, जनतेमधील प्रतिमा या गोष्टीदेखील महत्वाच्या ठरणार आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये नव्या इच्छुकांसह आजी-माजी-नगरसेवक पुन्हा नशीब आजमावण्यासाठी तयारीला लागले आहेत. तिकिटासाठी दावेदारी दाखल करताना दिसत आहेत. अर्थातच वॉर्डरचना व आरक्षण सोडतीनंतरच अंतिम चित्र निश्चित होणार असून या सोडतीमध्ये कुणाला लाभ होणार हे स्पष्ट होईल.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान आमदार अतुल बेनके यांनी आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस ही निवडणूक प्रतिष्ठेची करणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच नगरपालिका निवडणूक होणार असल्याने जुन्नरकर कुणाला कौल देणार, याविषयीच्या चर्चा सर्वत्र होत आहे. लोकसभा व विधानसभेला जुन्नर तालुक्यातील मतदारांनी बदल घडवला असून नगरपालिका निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात सत्ता जाणार की शिवसेनेवर पुन्हा जनता विश्वास दाखवणार? हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
भाजपदेखील या निवडणुकीमध्ये उतरणार असून त्या अनुषंगाने पक्षाची ताकत दाखवण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके व त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने भाजपची ताकद पूर्वीपेक्षा वाढली आहे. त्यामुळे भाजप आगामी निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करणार असल्याचे चर्चा आहे.
जुन्नरच्या विकासासाठी कटिबद्ध असून आगामी नगरपालिका निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढविणार असून सर्वांना सोबत घेऊन जाण्याची शिवसेनेची भूमिका आहे, प्रभागरचना व आरक्षण सोडती नंतरच तिकीट वाटपाबाबत बोलणे सोईस्कर होईल.
-शाम पांडे, लोकनियुक्त नगराध्यक्ष जुन्नर
आशा बुचके यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरपालिकेच्या सर्व जागा लढविणार आहोत. तशी तयारी झाला असून, भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार.
-अनिल रोकडे, भाजप नेता जुन्नर शहर
सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसची आहे. जुन्नरच्या सर्वांगीण विकासासाठी जनता राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच बहुमताने निवडून देणार, याची खात्री आहे.
-धनराज खोत, अध्यक्ष जुन्नर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस