जामखेड – जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कांदा विक्रीच्या पट्ट्या व अहवाल मिळण्याबाबत मोठ्या प्रमाणात टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी शासकीय नियमानुसार कांदा अनुदान मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसने तहसील कार्यालयावर आज 10 एप्रिल रोजी मोर्चा नेणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जामखेड कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात व तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जामखेड पोलीस स्टेशन व तहसिल येथे निवेदन देण्यात आले. शेतकरी बांधवांनी सोमवार दि. 10 रोजी सकाळी 9:00 वाजता जहीर ट्रेडर्स करमाळा रोड चौफुला येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी संतोष निगुडे, चोंडीचे सरपंच सुनील उबाळे, साकतचे सरपंच हनुमंत पाटील, जहीर शेख, बाळासाहेब पवार, गणेश ढगे, संतोष गोरे, अनिल जाधव, कैलास घरत, प्रशांत शिंदे आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.