पुणे – पुणेकरांना रविवारी सायंकाळी बेमोसमी पावसाने जबर तडाखा दिला. सिंहगड रस्त्यावरील धायरी-नऱ्हे भागांत काही प्रमाणात गारांसह, तर आंबेगाव परिसरात जोरदार वाऱ्यांसह पाऊस झाला. सिंहगड रस्त्यावर सनसिटी भागात झाडपडी झाली. कात्रज परिसरातील धनकवडी, बालाजीनगर, सुखसागरनगर, घाट परिसर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी परिसरांत जोरदार पाऊस झाला. यामुळे सुटीचा मुहूर्त साधून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची धांदल उडाली.
कात्रज परिसरात पाण्याचे लोट
कात्रज :कात्रज, धनकवडी, बालाजी नगर, सुखसागर नगर, घाट परिसर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, परिसरामध्ये अवकाळी पावसाने नागरिकांची धावपळ उडाली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. तर धनकवडीकडे जाणाऱ्या त्रिमूर्ती चौक येथील भागामध्येही पाणी साचले होते. या किरकोळ पावसानेही ड्रेनेज लाइन ओव्हरफ्लो होऊन चेंबरची झाकणे निघाली. अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. पावसामुळे काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. रेनकोट व इतर पावसाळी साहित्य नसल्याने अनेक दुचाकीस्वार पावसात भिजले. बालाजीनगर येथे रस्त्यावरील पथारीवाले भाजी मार्केट येथील भाजी विक्रेत्यांची दाणादाण उडाली.
गारांचा पाऊस आणि झाडपडी
सिंहगड रस्ता :सायंकाळी पाचच्या सुमारास धायरी-नऱ्हे परिसरात सुरुवातीला हलकीशी गारपीट आणि त्यानंतर मोठा पाऊस झाला. तर, नांदेड सिटी परिसरात मात्र हलकासा पाऊस झाला. गारा वेचण्यासाठी काही ठिकाणी मुलांची धांदल दिसून आली. तर, सनसिटी परिसरात मात्र पावसाने मोठे नुकसान झाले. पाच ते सहा ठिकाणी झाडपडी झाली. माताजी मार्केट परिसरात पत्रा शेड आणि भाजीपाला वाहतुकीच्या टेम्पोवर झाडाची फांदी कोसळली. त्यामुळे नुकसान झाले. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत हे झाड हटवले.
वडगावशेरी परिसरात जोरदार
रविवारी सायंकाळी वडगावशेरी परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. तत्पूर्वी सोसाट्याचा वाराही सुटला होता. काही ठिकाणी व्यावसायिकांचे होर्डिंग्ज, बोर्ड पडले. पण, फार काही नुकसान झाले नाही. आनंदपार्क, खराडी बायपास, सोमनाथनगर भागांत नागरिकांची या पावसामुळे धांदल उडाली. तर, काही ठिकाणी पाणी साचले.
येरवडा, विश्रांतवाडीत वीज गूल
पूर्व उपनगरांतील लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी, कळस, येरवडा आदी भागांत मुसळधार पाऊस झाला. तर, चंदननगर भागातही पावसाचा जोर होता. जोरदार वारे वाहत होते. विजाही चमकत होत्या. काही ठिकाणी किरकोळ पाणी साचले. तर, महामार्गावर वाहतूक कोंडीही झाली. येरवडा, विश्रांतवाडी भागांत वारा सुटल्याने वीज गेली होती. मात्र, महावितरण प्रशासनाने यंत्रणा तातडीने पूर्ववत केली.
मुंढवा परिसरात पाणीच पाणी
मुंढवा गाव, केशवनगर आणि मांजरी रस्ता परिसरात पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. वाऱ्याचा जोर इतका होता, की पदपथांवरील विक्रेत्यांचे साहित्य उडून गेले. तर, महात्मा फुले चौकात नेहमीप्रमाणे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अन्य काही नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
कोथरूड :वादळी वाऱ्यासह जोरदार पडलेल्या पावसाने पौड रस्त्यावरील कोथरूड डेपो, मोरे विद्यालय, कचरा डेपो, कर्वे पुतळा याठिकाणी पाणी साचले. सुट्टीच्या दिवस, त्यामुळे दुपारी फिरायला किंवा खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या कोथरूडकरांचा हिरमोड केला. तासभर झालेल्या पावसामुळे काही बैठ्या दुकानांमध्ये पाणी शिरले. तर झाडपडीच्या किरकोळ घटना घडल्या. अग्निशमन दलाचे मदतकार्य उशिरापर्यंत सुरू होते.
वारजे :ढगाळ वातावरण, सायंकाळी जोरदार पावसाच्या आगमनाने धांदल उडाली. कर्वेनगर, वारजे, गणपती माथा भागांत ठिकठिकाणी झाडे पडली. कर्वेनगर चौक, वारजे उड्डाणपूल, जुना जकातनाका याठिकाणी पाणी साचले होते. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर वारजे ते गणपती माथा परिसरात वाहतूक कोंडी झाली.
बावधन :परिसरात दुपारपासून ढगाळ वातावरण आणि मध्येच ऊन असा लपंडाव सुरू होता. मात्र, सायंकाळी पाच वाजता धो-धो पडलेल्या पावसाने पाणी वाहू लागले. काही ठिकाणी खोदकामांमुळे रस्ता धोक्याचा बनला होता. शिंदे पेट्रोल पंप, वरदायिनी हॉटेल यासह बावधन गावात पाणी साचले होते.