मुंबई – युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयने रद्द केले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती.
मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना हायकोर्टाने 2 लाखांचा दंडदेखील सुनावला आहे. नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. दरम्यान, हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आता नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.