अबाऊट टर्न: निसर्गधर्म

हिमांशू

कोंबडा कोकिळेसारखं गाऊ शकेल का? निश्‍चितच नाही! आपण कोकिळेच्या ओरडण्याला “गाणं’ म्हणतो आणि कोंबड्याच्या ओरडण्याला “बांग’ म्हणतो. कोंबडाही कदाचित भल्या पहाटे उठून गाण्याचा रियाज करत असेल; पण आपल्याला ते कसं कळणार? राग आळवण्याची प्रत्येक प्राण्याची स्वतःची शैली आहे. शहरात हल्ली कोंबड्याची बांग क्वचितच ऐकू येत असली, तरी ग्रामीण भागात कोंबड्याशिवाय दिवस उजाडतच नाही.

चित्रविचित्र आवाज काढून झोपेतून खडबडून जागं करणारी, गजराच्या घड्याळापासून मोबाइलच्या अलार्मपर्यंत अनेक कृत्रिम साधनं आपण वापरून पाहिली; पण कोंबड्याच्या आरवण्यानं सुरू होते, तीच खरी प्रसन्न सकाळ! अर्थात, लोकलच्या खडखडाटानं खबडबून जागं होण्याची सवय लागल्यामुळं ज्यांनी कोंबड्याची बांग ऐकलीच नाही, ते लोकलपुढं हात जोडतील आणि कोंबड्यावर ध्वनिप्रदूषणाचा आरोप करतील.

खरं तर वाढत्या शहरीकरणामुळं ग्रामीण-शहरी भेदभाव अनेक ठिकाणी संपुष्टात आलाय. अनेक शहरांनी ग्रामीण लोकसंख्या चुंबकासारखी ओढून घेतलीय तर अनेक शहरांनी स्वतःच्या अंगविस्ताराबरोबर आजूबाजूची गावंच आपल्यात सामावून घेतलीत. दुसरीकडे, ग्रामीण भागाबद्दल आणि मुख्यत्वे लोकांबद्दल उगीच आकस बाळगून बोलणाऱ्या असंख्य धनिकांनी शहरीकरणाचे लाभ यथेच्छ उपटल्यानंतर इन्व्हेस्टमेन्ट म्हणून ग्रामीण भागात “एनए’ न केलेली जमीन घेऊन (फार्म नसलेली) फार्महाऊस बांधलीत. तरीसुद्धा शहरी-ग्रामीण संघर्ष शमला नाही आणि एका कोंबड्याच्या निमित्तानं तो उफाळून आला. तोसुद्धा भारतात नव्हे… फ्रान्समध्ये!

होय, फ्रान्समधील कोंबडेही पहाटेच आरवतात! शहरी कोलाहलापासून मुक्‍ती मिळवण्यासाठी ओरेलिन बेटावर एका दाम्पत्यानं घर बांधलं होतं आणि सुटीत राजा-राणी तिथं राहायला आले. पण हा ग्रामीण इलाका असून, पहाटे कोंबडा आरवणं शक्‍य आहे, हे या दाम्पत्यानं गृहीत धरलंच नाही. परिणामी त्यांच्या शेजारणीकडे असलेला “मॉरिस’ नावाचा देखणा कोंबडा पहाटे त्यांच्या झोपमोडीचं कारण ठरू लागला. किरकोळ भांडणं वाढली आणि या दाम्पत्याला काही शहरी लोकांनी साथ दिली. दुसरीकडे गावकऱ्यांची फळी उभी राहिली. पाहता-पाहता प्रकरण कोर्टात गेलं आणि सोशल मीडियावरही “सेव्ह मॉरिस कॅम्पेन’ सुरू झाल्यामुळं हा राष्ट्रीय प्रश्‍न बनला.

योगायोगानं “गॅलिक रूस्टर’ म्हणजे फ्रेंच कोंबडा हे फ्रान्सचं राष्ट्रीय चिन्ह आहे. त्यामुळं संघर्षाला धार चढणं स्वाभाविक होतं. काही उत्साही तरुण मंडळींनी “सपोर्ट मॉरिस-अ फ्रेंच कॉक’ असं छापलेले टी-शर्ट वापरायला सुरुवात केली. कोरिन फेस नावाच्या महिलेचा लाडका “मॉरिस’ हळूहळू हजारोंचा लाडका बनला. कोर्टात जेव्हा हे प्रकरण सुनावणीला आलं, तेव्हा ज्युलियन नावाच्या वकिलानं “मॉरिस’ची रितसर बाजू मांडली. अखेर, ओरडणं हा कोंबड्याचा निसर्गधर्म आहे आणि तो शांततेचा भंग ठरू शकत नाही, असा निकाल लागला.

तात्पर्य, निसर्ग सर्वांचा आहे आणि प्रत्येक प्राण्याला आपापल्या निसर्गधर्माचं पालन करायचा अधिकार आहे. कोणत्याही प्राण्यानं आपल्या आयुष्यात हस्तक्षेप केलाय, असं वाटलं तर आधी आपण त्याच्या घरात हस्तक्षेप केलाय का, हा प्रश्‍न माणसानं स्वतःला विचारला पाहिजे. आपल्याकडे वाघ-बिबट्यांसह अनेक वन्यजीवांच्या बाबतीत हे घडलंय. कोंबड्याची बांग निमित्तमात्र… आपल्याला जाग आणण्यासाठी! पण जागं करणाऱ्याच्याच गळ्यावरून सुरी फिरवायची हा आपला निसर्गधर्म बनला असेल, तर कोण काय करणार?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)