पुणे- रंगभूमीवरचा नटसम्राट म्हणजेच, दिवंगत अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा आज स्मृतिदिन. डॉ. लागू यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1927 या दिवशी सातारा येथे झाला. त्यांचे वडील बाळकृष्ण लागू हे देखील डॉक्टर होते. आईचे नाव सत्यभामा होते. डॉ. लागू यांचे शिक्षण पुण्यात भावे हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण घेतले.
‘डॉ. श्रीराम लागू’ भारतीय चित्रपटाच्या इतिहासातले एक तेजस्वी अभिनय पर्व असलेले, नटसम्राट गणपतराव बेलवलकरांसारखी अनेक पात्रे रंगभूमीवर चिरंजीव करणारे, अनेक नाटककारांना प्रयोजन देणारे, व्यक्तिमत्व म्हणजे, श्रीराम लागू. मराठी रंगभूमीवरचा नटसम्राट या शब्दात श्रीराम लागूंचे वर्णन करता येईल. मराठी रंगभूमी, चित्रपट, हिंदी चित्रपट यात यशस्वी मुशाफिरी करणारे लागू खऱ्या अर्थाने रमले ते नाटकातच.
डॉ. श्रीराम लागूच्या रंगभूमीवरच्या एकाहून एक सरस भूमिका गाजल्या त्यातही कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ मधील गणपतराव बेलवलकरांच्या भूमिकेने अभिनय कारकिर्दीला हिमालयाची उंची गाठून दिली. त्यातील संवाद फेक ही रसिकांच्या विशेष लक्षात राहिली. त्यानंतर शांताराम बापूंच्या ‘पिंजरा’तल्या अभिनयाने तर इतिहास घडवला.
‘सामना’, सिंहासन’, ‘मुक्ता’ या सारख्या चित्रपटांमुळे डॉ. लागू आणि राजकीय चित्रपट हे समीकरण जुळले. दरम्यान, गेल्या वर्षी 17 डिसेंबर 2019 रोजी डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जर तुम्हाला ही पोकळी भरून काढायची असेल तर “लमाण” हे डॉ. श्रीराम लागू यांनी लिहीलेले स्वताःचे आत्मचरित्र एकदा वाचा.