कर्जत – कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अश्विनी शामराव कानगुडे यांची तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हेमंत मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली.
सभापती पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अश्विनी कानगुडे तर भाजपच्या वतीने ज्योती शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून हेमंत मोरे तर शिवसेनेकडून प्रशांत बुद्धिवंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी पंचायत समितीच्या सात सदस्यांची संयुक्त बैठक झाली. भाजपच्या विद्यमान सभापती साधना कदम या गैरहजर राहिल्या.
या बैठकीला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड यांच्या उपस्थितीत बैठक झाली.यावेळी पदाधिकारी निवड बिनविरोध करण्याचे एकमताने ठरले. त्यानंतर भाजपाच्या उमेदवारांचे अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे कर्जत पंचायत समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकला आहे.
निवडीनंतर फटाके फोडत आणि गुलालाची उधळण करत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे, नानासाहेब निकत, नगरसेविका मनिषा सोनमाळी, शाम कानगुडे, सुनील शेलार, ऋषिकेश धांडे, दिपक यादव, अशोक धांडे, ज्ञानदेव सायकर आदी उपस्थित होते.
पुढील वर्ष जाधव यांना संधी
दरम्यान कर्जत पंचायत समितीचे सभापती व उपसभापती निवडीसाठी 6 जानेवारीला आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत सभापती पदासाठी अश्विनी कानगुडे तर उपसभापती पदासाठी हेमंत मोरे यांची नावे निश्चित झाली होती. बैठकीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, अण्णासाहेब मोरे, दिलीप जाधव, नितीन धांडे आदी उपस्थित होते. एक वर्ष कानगुडे तर पुढील वर्ष जाधव यांना संधी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य आणासाहेब मोरे यांनी दिली.