बाजार समितीच्या कृषी जनावरे प्रदर्शन आणि डॉग शोची तयारी पूर्ण
रेडा – इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आयोजित कृषी जनावरांचे भव्य प्रदर्शन, घोडेबाजार आणि डॉग शोचे आज (दि. 8) राज्याचे माजी महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थित पार पडणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
कृषी जनावरे प्रदर्शन, घोडेबाजार आणि डॉग शो या सर्व कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती घेण्यासाठी व प्रत्यक्षिक पाहण्यासाठी बुधवार (दि. 8) पासून कृषी प्रदर्शन खुले राहणार आहे. येथील घोडे बाजारात विविध जातीच्या जवळपास 700 घोड्यांची संख्या दाखल होईल.
पुणे जिल्ह्यातील एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर आहे की, या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, नागरिकांना घोडे खरेदी-विक्री करण्याची संधी मिळते. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कृषी आणि जनावरे प्रदर्शन, घोडेबाजार, तसेच घोडे नाचकाम स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासाठी घोडे नाचकाम व घोडे चालीची शो-मॅच पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालक मंडळांनी केले आहे.
बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, तसेच इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष नानासाहेब शेंडे, ज्येष्ठ नेते कालिदास देवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मेघश्याम पाटील, सुभाष दिवसे, संतोष वाबळे, महावीर गांधी यांसह मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाच्या जागेची मंगळवारी (दि. 7) पाहणी केली. कृषी प्रदर्शनाचा समारोप रविवारी (दि. 12) राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.