अजित पवारांच्या फोटोसाठी राष्ट्रवादी आक्रमक

पुणे : अंदाजपत्रकात छापण्यात आलेल्या नेत्यांच्या फोटोवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस तसेच भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. अंदाजपत्रकात पहिल्या पानांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्यात आला. तर तिसऱ्या पानांवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचा फोटो छापल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आक्षेप घेतला. तर, कॉंग्रेसचे दोन आमदार विधान परिषदेवर असतानाही त्यांच्या फोटोंनाही स्थान देण्यात न आल्याने कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही नाराजी व्यक्‍त करत निषेध नोंदविला.

स्थायी समिती अध्यक्षांचे अंदाजपत्रकाचे सादरीकरण संपताच, विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ यांनी प्रकारावरून नाराजी व्यक्‍त केली. तसेच, याचा खुलासा करण्याची मागणी केली. यावेळी माजी सभागृह नेत्यांनी सर्वांच्या नेत्यांचे फोटो लावले असल्याचा खुलासा करत, कोणतीही चूक झाली नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक अधिक आक्रमक झाले. माजी उपमहापौर दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, प्रशांत जगताप, नगरसेविका अश्‍विनी कदम, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी त्याला प्रत्युत्ततर देत चूक मान्य करावी तसेच पुन्हा प्रोटोकॉलनुसार फोटो लावण्यात यावे, अशी मागणी केली.

मात्र, भाजपकडून ही चूक नसल्याचे सांगण्यात येत होते, त्यामुळे विरोधीपक्षांच्या नगरसेवकांनी महापौरांसमोर येत चूक दुरुस्त करावी, अन्यथा अंदाजपत्रकाच्या चर्चेत सहभाग घेणार नाही तसेच सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका घेतली.
त्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मध्यस्थी करत सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या बद्दल संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन पुढील बैठकीला उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पवार यांचा फोटो पहिल्या पानावर घेण्यात यावा, असे आदेश त्यांनी दिले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.