जॅकलीन फर्नांडिसच्या करिअरची गाडी सध्या सुस्तावली आहे. सुरुवातीच्या काळात तिचा आलेख ज्या वेगाने चढत राहिला तो वेग आता कमी झाला आहे. विशेषतः “रेस 3′ आणि “ड्राईव्ह’ यांसारखे चित्रपट न चालल्यामुळे तिचा करिअरग्राफ अधिकच खालावला. मधल्या काळात अशी चर्चा बी-टाऊनमध्ये ऐकायला मिळाली की जॅकलीनला हॉलीवूडचा एक प्रोजेक्ट मिळाला आहे आणि त्यामुळेच ती बॉलीवूडचे चित्रपट स्वीकारत नाहीये.
पण मध्येच अचानक बातमी आली की, ती सलमान खानसोबत “कभी ईद कभी दिवाली’ आणि “किक2′ या चित्रपटात झळकणार आहे. पण या चित्रपटांचे चित्रीकरण अद्यापही सुरू झालेले नाहीये. आता खबर आली आहे की, तेलगू सुपरस्टार पवन कल्याणसोबत जॅकलीन एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.
पण सूत्रांच्या माहितीनुसार, जॅकलीनने या चित्रपटासाठी भरमसाठ मानधनाची मागणी केली आहे आणि त्यावरुनच पुढची बोलणी लटकलेली आहेत. जॅकलीनच्या कारकिर्दीला आलेली मरगळ पाहता तिने इतकी “डिमांडिंग’ होणं योग्य नाही.