सातारा – राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणाबाजी करुन सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध केला. सत्तारांनी खा. सुळे यांची तात्काळ माफी न मागितल्यास त्यांना राज्यात फिरु देणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी दिला.
सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना अपशब्द वापरले, या घटनेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने राज्यभरात जोरदार निषेध करण्यात आला. सत्तार यांच्या निषेधासाठी राष्ट्रवादी भवनात सायंकाळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते जमा झाले होते. राष्ट्रवादी भवनासमोर मंत्री सत्तार यांच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. सत्तारांनी तात्काळ सुप्रिया सुळेंची माफी न मागितल्यास त्यांना राज्यात फिरु देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, प्रभारी महिला जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, युवक प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलवडे, युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख, सेवादल महिला प्रदेश संघटिका सीमा जाधव, युवती जिल्हाध्यक्ष पूजा काळे, विद्यार्थी प्रदेश निरीक्षक अतुल शिंदे, पारिजात दळवी, सुनील भारती, महेश जाधव, गिरीश फडतरे, गणेश ताटे, दत्ता फाळके, सनी शिर्के, अजित बर्गे, सिद्धेश पवार, अवी भोसले, प्रथमेश पवार, ऋषी कणसे, सागर पवार, सचिन जाधव, वरद फडतरे, तेजस भोसले, विकास अवघडे आदी सहभागी झाले होते.