पुणे – महाराष्ट्रीय मंडळ, ब्लाईंड क्रिकेट संघटना आणि पुणे पुरूष ब्लाईंड संघटना यांच्या तर्फे संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ब्लाईंड क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल संघाने गोवा संघाचा ९ गडी राखून पराभव करत विजेतेपद मिळवले.
मुकूंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना गोवा संघाने २० षटकामध्ये ६ गडी गमावून १६९ धावांचे लक्ष्य उभे केले. संघाच्या डावाची आकारणी करताना गोवाच्या आफताब पटेल याने ७४ धावांची खेळी केली. साईनाथ कुमार (२६ धावा) आणि दिनेश पाडाळे (१७ धावा) यांनीही दुसर्या बाजूने साथ दिली आणि संघाला समाधानकारक लक्ष्य उभे करून दिले.
पश्चिम बंगाल संघाच्या सलामीवीरांनी संघाला दमदार सुरूवात करून दिली. राजु हलदेर याने ४३ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी केली. अरींदम मोंडल याने ४५ चेंडूत १० चौकारांसह ६६ धावांचे योगदान दिले. या दोघांनी ८२ चेंडूत १४६ धावांची दमदार भागिदारी करत विजयाचा पाया रचला. पश्चिम बंगालने हे लक्ष्य १५.५ षटकामध्ये व १ गडी गमावून पूर्ण केले.