पुणे – महाराष्ट्रीय मंडळ, ब्लाईंड क्रिकेट संघटना आणि पुणे पुरूष ब्लाईंड संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ब्लाईंड क्रिकेट स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट या संघांनी सलग दोन विजय मिळवले. पश्चिम बंगाल आणि गोवा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.
मुकूंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ आणि डेक्कन जिमखाना क्लबच्या मैदानावर झालेल्या सामन्यात योगेश जे. याने फटकावलेल्या शतकी खेळीमुळे कर्नाटक संघाने पंजाब संघाचा ८९ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कर्नाटक संघाने २६७ धावांचे आव्हान उभे केले. योगेश जे. याने ६७ चेंडूत २५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १३७ धावा फटकावल्या. हरीश एस. (६२ धावा) आणि प्रभु हलीयाल (३५ धावा) यांनी दुसर्या बाजूने सुरेख साथ दिली. या आव्हानासमोर पंजाब संघाचा डाव १७८ धावांवर मर्यादित राहीला.
रोहीत भारगुणे याच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीमुळे महाराष्ट्र संघाने उत्तरप्रदेश संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला. महाराष्ट्र संघाने कालसुद्धा १० गडी राखून विजय मिळवला होता. उत्तरप्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा धावफलकावर लावल्या. उस्मान देवण याने नाबाद ७१ धावांची खेळी केली.
महाराष्ट्र संघाने १२.३ षटकात हे आव्हान पूर्ण केले. रोहीत भारगुणे याने नाबाद ६९ धावांची तर, अजय सिदाम याने नाबाद ६९ धावांची खेळी करून संघाला सहज विजय मिळवून दिला. रहमत अली याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पश्चिम बंगाल संघाने पंजाब संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. निलेश वीर याच्या नाबाद १११ धावांच्या खेळीमुळे गोवा संघाने उत्तरप्रदेश संघाचा २४ धावांनी सहज पराभव करून विजयी कामगिरी केली.