Nashik Pune Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात टेम्पो कारवर कोसळली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एक महिला आश्चर्यकारकरित्या बचावली आहे.
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी रात्री आठच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. अतिशय भयंकर पद्धतीने घडलेल्या या घटनेत धावता आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या कारच्या वर कोसळल्याने कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या आयशर टेम्पोला कार ओव्हरटेक करत असताना अचानक टेम्पो त्या कारवर कोसळल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेनंतर चंदनापुरी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदत कार्य सुरू केले, त्यामुळे एका महिलेचा जीव वाचला. मात्र दुर्दैवाने अकोले तालुक्यातील एका दोन वर्षीय चिमुकलीसह चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
ओजस्वी धारणकर (वय 2 वर्ष), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनील धारणकर (वय 65 वर्ष) व अभय सुरेश विसाळ (वय 48 वर्ष, सर्व या.अकोले) या चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अस्मिता अभय विसाळ या महिलेला ग्रामस्थांच्या मदतीने वाचविण्यात यश आले आहे. यावेळी नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून तासाभरात वाहतूक सुरळीत केली. या घटनेने संगमनेरसह अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.