नाशिकमध्ये 120 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज – जिल्हाधिकारी मांढरे

नाशिक – सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्याला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून सध्या केवळ 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांत ऑक्सिजनची मागणी दुप्पटीने वाढली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

नाशिकमध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. रोज 6 हजाराच्या पटीत नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. जिल्ह्यातील सर्वच सरकारी आणि खाजगी हॉस्पिटलमधील बेड फुल झालेले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडाही निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाने उद्योगांना लागणारा 100 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय कामासाठी वळवला आहे. मात्र, तरीदेखील ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. आज नाशिक जिल्ह्याला 120 मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून केवळ 85 मॅट्रिक टन ऑक्सिजन सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तूटवडा निर्माण झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत दुप्पटीने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा अतिरीक्त वापर –

काही खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा अतिरीक्त वापर होत असून हॉस्पिटलने सुद्धा ऑक्सिजनचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. दुपारपर्यंत औरंगाबाद आणि नगरमधून ऑक्सिजनची मदत मिळणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

नाशिकच्या सिक्स सिगमा, श्री गुरूजी हॉस्पिटल, नारायणी हॉस्पिटल सारख्या बहुतांश हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने नातेवाईकांना फोन करून रुग्ण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितल्याने नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. एकीकडे सर्वच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड फुल असून रुग्णांच्या नातेवाईकांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.