अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपाचा नेमका पाठींबा कोणाला? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपाने क्रॉंग्रेसकडून निलंबित अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या बद्दलचा निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर केला आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीसाठी तांबेंनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर कॉंग्रेसने त्यांना निलंबीत करत, शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपाकडून आत्ता निर्णय जाहिर करण्यात आला असला तरी, सुरुवातीपासूनच तांबेंच्या प्रचारात भाजपाचे स्थानिक नेते सक्रिय असल्याचे चित्र होते. भाजपाचे नेते तथा माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांनी शिरपूरमध्ये प्रचार मेळावा घेऊन सत्यजित तांबेंना मतदान करण्याचे आवाहन पदवीधरांना केले होते.
तांबेंच्या पाठिंब्याची घोषणा करताना विखे पाटील म्हणाले की, “निर्णय जाहीर करण्याचा प्रश्नच नाही. कारण कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु पक्षाच्या वतीने पाठिंबा अजून जाहीर झालेला नाही. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर हा निर्णय घेतला आहे,’ असे विखे पाटील यांनी म्हटले आहे. यापूर्वीही विखे पाटील यांनी भूमी पुत्रांना न्याय दिला पाहिजे,असे म्हटले होते.
कार्यकर्त्यांकडून निर्णय –
“आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या पातळीवर झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण आहेत. होतकरू आहेत. त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्राधान्य दिले आहे. सत्यजित तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.