नाशिक :- शेतकऱ्यांनी पिकविलेल्या कांद्यास हंगामानुसार योग्य हमीभाव मिळावा त्याचप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. शनिवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उप बाजार समितीस दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.
मंत्री भुजबळ म्हणाले, कांद्याच्या प्रश्नाबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे. यासोबतच नाशिक जिल्ह्यात नाफेडचे कांदा खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी केली असून ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. कांद्यास अनुदान मिळण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरवा केला असून कांद्यासाठी ३५० रूपये प्रतिक्विंटल अनुदान राज्य शासनाने यापूर्वीच मंजूर केले आहे.
यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ८६५ कोटी रूपयांचे अनुदान मिळणार असून ते दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. यापैकी ४६५ कोटी अनुदान वितरीत करण्यास शासनाने नुकतीच मंजूरीही दिली आहे. यात ६० टक्के शेतकरी हे नाशिक जिल्ह्यातील असून ४३५ कोटी रूपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होणार असल्याची माहितीही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे साहजिकच कांद्याचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे कांद्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी लवकरच शासन स्तरावर शेतकरी प्रतिनिधी, कांदाव्यापारी, बाजार समित्यांचे पदाधिकारी यांची एकत्र बैठक घेण्यात येणार असून यात सर्वांच्या समस्याजाणून घेवून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.