लोणी काळभोर, (वार्ताहर) -पुण्यात एका व्यावसायिकाचा खून करून फरारी असलेल्या दोघांना पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व पुणे शहर पोलीसांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.
संतोष नाक्ती (वय 28, रा. गाऊडदरा, ता. हवेली) व सुधीर कामठे (वय 24, रा. कुसगाव, ता. भोर) अशी आरोपींची नावे आहेत. अर्जुन मोहिते आपल्या पथकासह खेड शिवापूर परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांच्या पथकातील कर्मचारी मोसीन शेख यांना बातमी मिळाली. दि. 12 रोजी नऱ्हे, पुणे शहर येथील एका व्यावसायिकाचा खून करून फरारी झालेले आरोपी कुसगाव (ता. भोर) येथील शेतातील झोपडीत लपले आहेत. त्याच परिसरामध्ये आरोपींच्या शोधात असलेले सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या पथकास घेऊन आरोपींची माहिती मिळालेल्या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी दोघांना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.