बंगळूर- चांद्रयान-2 मोहीम इप्सित साध्य गाठण्यापासून वंचित राहिल्याने भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख के.सिवन भावूक झाले. त्यातून अनावर झालेल्या अश्रूंना त्यांनी मोकळी वाट करून दिली. त्यामुळे सिवन यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि शास्त्रज्ञांना असणारा भक्कम पाठिंबा दर्शवण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दृढ आलिंगन दिले. त्या दृश्याने सगळ्यांच्याच मनावर मोहिनी घातली.
चांद्रयान-2 मोहिमेच्या यशाचा साक्षीदार होण्यासाठी मोदी येथील इस्त्रो सेंटरमध्ये उपस्थित राहिले. मात्र, चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज असलेल्या विक्रम लॅंडरबरोबरचा संपर्क पहाटेच्या सुमारास तुटल्यानंतर काही काळाने मोदी तिथून निघून गेले. सुमारे सहा तासांनंतर सकाळी मोदी पुन्हा इस्त्रो सेंटरमध्ये दाखल झाले. तिथे सकाळी 8 वाजता त्यांनी शास्त्रज्ञांना आणि देशाला उद्देशून भाषण केले.
त्यानंतर जाण्यासाठी निघालेल्या मोदींना निरोप देण्यासाठी सिवन त्यांच्या कारपर्यंत गेले. त्यावेळी भावूक झालेल्या सिवन यांना मोदींनी आलिंगन दिले. त्याशिवाय, सिवन यांचे खांदे थोपटत मोदींनी जणू त्यांच्यात पुन्हा लढण्यासाठी जिद्द भरली.