बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा आज 34वा वाढदिवस आहे. राधिकाने चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्मण केले आहे. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळम अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये राधिकाने काम केले आहे. त्यामुळे दिग्गज कलाकार म्हणून राधिका आपटेची ओळख आहे. सोशल मीडियावर आज तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला.
राधिका आपटेचा जन्म 7 सप्टेंबर 1985 साली तामिळनाडूमधील वेल्लोर येथे झाला होता. त्यानंतर राधिकाचे सर्व कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तिने आपले प्राथमिक शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवी घेतली. राधिकाचे वडील डॉ. चारूदत्त आपटे पुण्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन आहेत.
अभिनयाची आवड असल्याने राधिकाने चित्रपटसृष्टीत पाउल ठेवले. तिने अनेक मराठीसह अन्य भाषांमधील चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मने जिंकली आहेत. राधिकाला तिच्या जन्मदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांनी शुभेच्छा देत भावी आयुष्यात यश मिळविण्याची प्रार्थना केली. तसेच काही जणांनी तिचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.