आता तरी काळजी घ्या ! पुण्यात चिमुकलेही करोनाच्या विळख्यात…

बाधितांमध्ये 0 ते 10 वयोगटाची वाढती संख्या चिंताजनक

पुणे – शहरात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यामध्ये 0 ते 10 या वयोगटातील मुलांची वाढती संख्या चिंताजनक आहे. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

यापूर्वी 10 महिन्यांनंतर शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, फेब्रुवारीत बाधित वाढू लागल्याने शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहे. महिनाभरात 0 ते 20 वयोगाटातील एकूण 811 मुले बाधित झाली आहेत. त्यामध्ये 0 ते 10 वयोगटातील 265, तर 11 ते 20 वयोगटातील 546 मुले बाधित झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलांच्या शाळा सुरू झाल्यामुळे आणि ही मुले बाहेर पडत असल्यामुळे ही संख्या वाढू शकते. मात्र, 0 ते 10 वयोगटातील मुले घराबाहेर पडत नसतानाही बाधितांची वाढती संख्या चिंता व्यक्त करणारी आहे.

जवळपास दररोज 15 ते 20 मुले बाधित

फेब्रुवारीतील काही दिवस सोडले, तर 0 ते 10 या वयोगटातील दररोज 15 ते 20 मुले बाधित सापडत आहे. 17 फेब्रुवारीपासून ही संख्या सातत्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दि.1 ते 26 फेब्रुवारीदरम्यान 11 दिवस बाधित संख्या ही प्रत्येकी 8 च्या आत होती. तर 15 दिवस बाधित संख्या ही प्रत्येकी 15 ते 20 एवढी आहे. त्यामध्ये दि. 17 आणि 20 रोजी 19 बाधित सापडले.

मुलांना आयसोलेट कसे करायचे?
या मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला, पोटदुखी, जुलाब होणे ही लक्षणे दिसून येतात. या मुलांना करोनाची लागण झाल्यावर त्यांची लक्षणे सौम्य असतात. तसेच त्यांना रुग्णालयात आयसोलेट करायचे म्हटल्यावर त्यांच्याबरोबर राहणार कोण? असा प्रश्‍न उपस्थित होतो. त्यामुळे डॉक्‍टरच त्यांच्यासाठी होम आयसोलेशन सूचवतात. त्यामुळे ही मुले पालकांच्या सहवासात राहून औषधोपचार घेतात.

0 ते 10 या वयोगटातील मुलांना करोना हा घरातील व्यक्तींपासूनच होतो, हे आतापर्यंतच्या ट्रेसिंगमधून दिसून आले. क्वचित एखाद्या मुलाला रुग्णालयात नेण्याची वेळ येते. सहा महिने किंवा वर्षाच्या मुलांना आयसोलेट करता येत नाही. घरातील बाधिताला त्या मुलाचा सांभाळ करण्यासाठी थांबवले जाते. यापूर्वीया वयोगटातील मुलांमध्ये तीव्र लक्षणे दिसली, तशी लक्षणे सध्या दिसत नाहीत. त्या तुलनेत बाधित सापडण्याचे प्रमाणही कमी आहे.
– डॉ. सागर लाड, बालरोग तज्ज्ञ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.