मुंबई – राजस्थानातील नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2023 या किताबाची मानकरी ठरली आहे. ती आता मिस वर्ल्ड या सौंदर्यस्पर्धेसाठी बारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. काल रात्री इंफाळमध्ये झालेल्या ग्रॅन्ड फिनालेमध्ये तिला मिस इंडिया वर्ल्ड म्हणून निवडण्यात आले.
अवघ्या 19 वर्षांची नंदिनी गुप्ता मूळची राजस्थानातील कोटा शहराची रहिवासी आहे. दिल्लीची श्रेया पूंजा उपविजेती तर मणिपूरची थाउनाजाम श्रेला लुवांग ही दुसऱ्या क्रमांकाची उपविजेती म्हणून निवडली गेली.
ग्रॅन्ड फिनालेच्या समारंभामध्ये सिनी शेट्टी, रुबल शेखावत, सिनाता चौहान, मानसा वाराणसी, मनिका शेवकांद, मान्या सिंह, सुमन राव आणि श्रावणी जाधव या सौंदर्यस्पर्धांमधील माजी विजेत्या सहभागी झाल्या होत्या. बॉलिवूड कलाकार कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांनीही नृत्याविष्कार सादर केले. या अंतिम फेरीमध्ये 30 राज्यांमधील विजेत्या सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
2002 सालची फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स नेहा धुपिया, बॉक्सिंगपटू लैशराम सरिता देवी, नृत्यदिग्दर्शक टेरेन्स ल्युईस, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखल हर्षवर्धन कुलकर्णी आणि फॅशन डिजायनर रॉकी स्टार आणि नम्रता जोशीपुरा यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले.