मुंबई – महाराष्ट्रात आता पर्यंत भाजप पक्षाच्या जाहिरातीत ‘देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र’ हे वाक्य ऐकायला मिळत होते. मात्र आता शिवसेनेकडून करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असे छापून आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, या जाहिराती मुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता पर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजप नेत्यांमध्ये या जाहिरातीमुळे नाराजी पसरल्याची बातमी समोर आली आहे.
दरम्यान, अश्यातच या जाहिरातीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना-भाजपवर बोचरी टीका केली आहे. “आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा इतका अपमान एकनाथ शिंदे हे करतील असं कधीच वाटलं नव्हतं. “दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है..’, अशी परिस्थिती शिंदेंनी करून ठेवली आहे.
आमच्या मित्राने आता जपून राहावं. ही जाहिरात खरी की खोटी हे समजून येईल. माझ्या मित्राला देवेंद्र यांना धोका निर्माण झालेला आहे. आमच्या मित्राच्या खुर्चीला आता धोका आहे. आमचे मित्र पुन्हा येईन-पुन्हा येईन असे बोलत होते पण आता दाढीवाले यायला निघाले आहेत.’ असं देखील नाना पटोले यावेळी म्हणाले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
जाहिरातीत नेमकं काय?
शिवसेनेकडून राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात देण्यात आली आहे. पहिल्या पानावर देण्यात आलेल्या या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकत आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिरातीत एका अंतर्गत सर्वेक्षणाचे निष्कर्ष देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात भाजपाला 30.2 टक्के, शिवसेनेला 16.2 टक्के मतं मिळतील, असं अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून 26.1 तर देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदासाठी 23.2 टक्के जनतेने पसंती दिल्याचा दावा या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.