विभागीय आयुक्तांकडे शिफारस : निष्ठावंताला न्याय देण्याचा प्रयत्न
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या गटनेते तथा पक्षनेतेपदी नामदेव ढाके यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे. याबाबतची माहिती भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांनी बुधवारी (दि. 12) दिली.
या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेस स्थायी समिती सभापती विलास मडेगिरी, मावळते सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व पदाधिकरी उपस्थित होते. या फेरबदलाला विभागीय आयुक्तांची मान्यता मिळताच महापौर माई ढोरे या ढाके यांना निवडीचे पत्र देतील. त्यानंतर अधिकृतपणे ढाके यांची सभागृहनेतेपदी निवड होईल.
फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. तेव्हापासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून एकनाथ पवार यांच्याकडे सभागृह नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. कामकाजामध्ये आमदारांचा वाढता हस्तक्षेप व निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याने पवार यांनी सोमवारी (दि.10) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या जागी नामदेव ढाके यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपच्या बैठकीत ढाके यांच्या नावावर एकमत झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीचे पत्र विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना देण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर ढाके पदभार स्विकारणार आहेत.
सत्तावाटपातील तडजोड?
प्रभाग क्रमांक 17 वाल्हेकरवाडी, चिंचवडेनगर, बिजलीनगरमधून ढाके निवडून आले आहेत. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून नामदेव ढाके यांची ओळख आहे. निवडून आल्यानंतर ढाके पहिल्या अडीच वर्षांत महापौरपदासाठी प्रबळ दावेदार होते. मात्र, त्या वेळी त्यांना डावलण्यात आले. आता त्यांची सभागृहनेतेपदी वर्णी लागली आहे. मात्र, दुसरीकडे स्थायी समितीच्या सभापती पदासाठीही ते प्रमुख दावेदार होते. सत्तासंघर्षामध्ये त्यांना हे पद देणे शक्य नसल्याने त्यांना सभागृहनेतेपद देण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.