नागपूर मेट्रो की डान्सबारचा अड्डा!

प्रासंगिक : मिलन म्हेत्रे

नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात चक्‍क मेट्रोच्या एका डब्यात डान्स आणि जुगार पार्टी झाली असल्याचे समोर आले आहे. यावेळी सुरू असलेला बिभत्स डान्स आणि जुगार-दारूच्या पार्टीचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला असून, त्याचीच चर्चा विविध वाहिन्यांसह सर्व माध्यमांवर सुरू आहे.

आपल्याकडे कोणाच्या डोक्‍यातून काय शक्‍कल निघेल, याचा काही नेम नाही. वाढदिवस साजरे करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा सध्या रूढ आहेत, त्यात रस्त्यावर रात्री 12 वाजता केक कापणे, केक तलवारीने कापणे, हातगाडीवर, स्कूटरवर किंवा गाडीच्या टपावर केक ठेवून तो कापणे आणि त्या अनुषंगाने पार्ट्या आयोजित करणे, असे प्रकार अलीकडच्या काळात सर्रास दिसून येत असले तरी नागपूरमध्ये घडलेली घटना धक्‍कादायकच म्हणावी लागेल.

नागपूर मेट्रोमध्ये 20 जानेवारीला “सेलिब्रेशन ऑन व्हील’च्या संकल्पनेवर हा तथाकथित कार्यक्रम नागपूरमधीलच नामांकित व्यक्‍तीने घडवून आणला. अवघ्या 3 हजार 50 रुपयांमध्ये एका तासासाठी मेट्रोचा एक डबा या कार्यक्रमासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आला. यावेळी मेट्रोच्या या डब्यात तृतीयपंथीयांचा डान्स झाला, त्यानंतर पत्त्यांचा डाव रंगला. या सर्व घटनेबाबत नागपूर मेट्रोच्या प्रमुखांनी या संबंधित व्यक्‍तींवर तक्रार दाखल केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे, पण या सगळ्या प्रकारानंतर काही प्रश्‍न निर्माण होतात, त्याची उत्तरे कोण देणार?

नागपूरचे ड्रीम प्रोजेक्‍ट
नागपूर मेट्रो हे खरे तत्कालीन प्रशासनासाठी “ड्रीम प्रोजेक्‍ट’ होते आणि त्याच तत्त्वावर त्यांनी ते पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या प्रकल्पाला फेब्रुवारी 2014 मध्ये महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली, तर भारताच्या नगरविकास मंत्रालयाने “इन प्रिन्सिपल’ मान्यता दिली. 20 ऑगस्ट 2014 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रकल्पाच्या विकासास मंजुरी दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 ऑगस्टला शहराच्या दौऱ्यावर पायाभरणी केली. प्रोजेक्‍टवरील बांधकाम 31 मे 2015 रोजी सुरू झाले, याच्या 7 चाचण्या होऊन 30 सप्टेंबर 2017 पासून मेट्रोचे काम सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 मार्च 2019 ला नागपूर मेट्रोवरील ऑपरेशनचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले.

उपराजधानीतील मेट्रोचे स्वरूप
प्रवाशांना सेवा देणे या उद्देशाने नागपूरमध्ये मेट्रोचा प्रकल्प राबवण्यात आला. राजधानी मुंबईनंतर उपराजधानीतील मेट्रोही मोठ्या थाटामाटात सुरू करण्यात आली. मात्र, “नॉन फेअर रेव्हेन्यू’ वाढवण्याच्या संकल्पनेतून “सेलिब्रेशन ऑन व्हील’ ही संकल्पना मेट्रोच्या एका डब्यामध्ये राबवण्यास सुरुवात करण्यात आली. 3 हजार 50 रुपये भरून या कोचमध्ये वाढदिवस, प्री-वेडिंग, एंगेजमेंट, लग्नाचे फोटोसेशन, महिलांसाठी हळदी-कुंकू आणि इतर छोटे-मोठे कार्यक्रम करण्यात येऊ लागले.

पैशांची उधळण
संबंधित व्यक्‍तीने नागपूर रेल्वेचे तीन कोच या योजनेअंतर्गत “बुक’ केले आणि ऍक्‍वा लाइनवर सीताबर्डी ते लोकमान्यनगरपर्यंत वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला. या दरम्यान तृतीयपंथीयांचा डान्सचा कार्यक्रम झाला आणि पैशांची मुक्‍त उधळण करण्यात आली, तसेच काही जण जुगार खेळले यावेळीही पैसे लावूनच हा प्रकार झाला.

अशा कार्यक्रमांना परवानगी कशी?
“सेलिब्रेशन ऑन व्हील’ ही संकल्पना कोणाची आणि अशा कार्यक्रमांना परवानगी कुठून मिळाली, मेट्रोचे अधिकारी याबाबत काही बोलत का नाहीत, हा प्रश्‍न अधोरेखित होत आहे. या संकल्पनेमुळे काही अनुचित प्रकार घडू शकेल, ही बाब प्रशासनाच्या आधीच लक्षात यायला हवी होती, पण “नॉन फेअर रेव्हेन्यू’ वाढवण्याच्या नादात या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

मेट्रो तोट्यात- हेच उघड सत्य
देशातील महानगरांमधील वाहतूक व्यवस्था सुरक्षित आणि वेगवान व्हावी, यासाठी मेट्रो प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. “स्मार्ट सिटी’मध्ये मेट्रो प्रकल्प हे सगळ्यांचेच आकर्षण ठरले. मेट्रोच्या प्रतिकृती, त्यांची प्रात्यक्षिकेही कुतुहलाने पाहिली गेली. मात्र, नागपूर मेट्रोमधील हुल्लडबाजीने या सगळ्यालाच गालबोट लावले आहे. मेट्रो फायद्यातच राहणार असे सांगणाऱ्यांनीच मेट्रो तोट्यात असल्याने “नॉन फेअर रेव्हेन्यू’च्या नावाखाली “सेलिब्रेशन ऑन व्हील’ची संकल्पना राबवावी लागली, हे उघड सत्य आहे.


“त्या’ कार्यक्रमानंतर झाले हळदी-कुंकू

बुधवार (दि. 20) च्या “त्या’ कार्यक्रमानंतर नागपूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र, त्यानंतर शनिवारी (दि. 23) येथील महिलांनी एक विधायक कार्यक्रम याच कोचमध्ये घेऊन हा कलंक पुसून टाकण्याचा चांगला प्रयत्न केला. पारंपरिक पद्धतीने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेऊन एकमेकींना वाण आणि तीळगूळ देत मकर-संक्रांत साजरी केली.

मेट्रो रेल्वे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे उपमहाव्यवस्थापक अखिलेश हळवे यांनी याबाबत सांगितले की, नागपूर मेट्रोमध्ये असे प्रकार यापुढे होऊ नयेत यासाठी मेट्रोचे नियम अधिकाधिक कडक करण्यात येणार आहेत, मेट्रो कोच बुकिंगच्या डिपॉझिटची रक्‍कम वाढवण्यात येणार आहे आणि हा अवैध प्रकार ज्यांनी केला त्यांचे डिपॉझिटही रद्द करण्यात येणार आहे. “नॉन फेअर रेव्हेन्यू’ ही संकल्पना सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आहे; पण यापुढे अनेक गोष्टींबाबत गांभीर्याने विचार करूनच ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.