जामखेड – धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी तिसऱ्या दिवशी माजीमंत्री आ.राम शिंदे यांनी भेट देऊन विचारपूस केली. धनगर आरक्षणप्रश्नी शासन पातळीवर हालचाली सुरू असून, लवकरच ठोस निर्णय होण्याचे सूतोवाच आ. शिंदे यांनी केले.
यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे म्हणाले, धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, ही मागणी घेऊन यशवंत सेनेने दोन महिन्यांपूर्वी तब्बल एकवीस दिवसांचे आमरण उपोषण केले. ते उपोषण थांबविताना सरकारने 50 दिवसांत अंमलबजावणी संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, या कालावधीत शासनाकडून काहीच कृती झाली नाही. त्यामुळे पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली. उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले आणि सुरेश बंडगर यांची शनिवारी (ता.19) माजीमंत्री आ.राम शिंदे यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
उपोषणकर्ते यशवंतसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, नितीन धायगुडे, डॉ.शशिकांत तरंगे, स्वप्निल मेमाणे, संतोष कुरडूले, समाधान पाटील उपस्थित होते.