सातारा – रयत शिक्षण संस्थेचा शंभरावा वर्धापनदिन शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. या शताब्दी सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. कर्मवीर समाधी परिसराच्या प्रांगणात होणाऱ्या सोहळ्यामध्ये इन्फोसिसचे संस्थापक डॉ. एन. आर. नारायण मूर्ती यांना डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार तर थर्मेक्स कंपनीच्या माजी अध्यक्षा अनू आगा यांना रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, अडीच लाख रुपये रोख व रयत वस्त्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमाला रयत परिवाराचे माजी कार्याध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील, विद्यमान कार्याध्यक्ष, डॉ. अनिल पाटील, उप कार्याध्यक्ष भगीरथ शिंदे, सहसचिव (माध्यमिक) विजय सावंत, सहसचिव (प्राथमिक) विलास महाडिक उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीची वाटचाल उलघडून दाखवणारा रयत शिक्षण पत्रिका या कर्मवीर विशेषांकाचे प्रकाशन शरद पवार व डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी विजयादशमीच्या मुहुर्तावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शनिवारी, 4 ऑक्टोबर 1919 रोजी काले (ता. कराड) सत्यशोधक समाज परिषदेत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यात 737 शाखा 13553 सेवकांचे ज्ञानदान व 458044 विद्यार्थी इतका मोठा पसारा असणारी ही संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयांनी नॅकची प्रतिष्ठित नामांकने प्राप्त केली असून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र साताऱ्यात सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
याशिवाय यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाविद्यालय यांच्या एकत्रीकरणातून स्वतंत्र विद्यापीठाचा प्रस्ताव मांडण्यात आला असून त्यांची घोषणा सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्रांतीचे नवे पर्व असणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात अनेक महत्वाच्या प्रकल्पांची घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पवार आज पुन्हा साताऱ्यात
गुरूवारी श्रीनिवास पाटील व दीपक पवार यांच्या उमेदवारी अर्जानिमित्त सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादीचे साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष स्वतः साताऱ्यात तळ देऊन असणार आहे.
गुरुवारी सायंकाळी पवार साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी सोहळ्यासाठी मुक्कामी येत आहेत. जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचा स्वतः पवार आढावा घेणार असल्याने या दौऱ्याला प्रचंड राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.माणमध्ये राष्ट्रवादी प्रभाकर देशमुख यांना कशी ताकद देणार, फलटणमध्ये कोणाचे भाग्य उजळणार इत्यादी प्रश्नांवर पवारांची काय भूमिका आहे, याविषयी जिल्ह्याच्या वर्तुळात चर्चा असणार इतके नक्की.