आळंदीत कामगार वेतनापासून वंचित

पालिका ठेकेदाराकडून दोन महिन्यांपासून वेतन नाही

आळंदी – पालिकेतील ठेकेदारामार्फत काम करणाऱ्या कुशल-अकुशल कामगारांचे दोन महिन्यांपासून वेतन झालेले नाही. त्यामुळे पालिका लक्ष देईना आणि ठेकेदार वेतन देईना, अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या कर्मचाऱ्यांना आता सणासुदीच्या तोंडावर वेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.

पालिकेने कुशल-अकुशल कर्मचारी पुरवण्याचा ठेका दिलेला आहे. मागील वर्षीपासून वेळेत वेतन करत नसतानाही पालिकेने निविदा प्रक्रिया मार्च महिन्यातच पूर्ण करण्याऐवजी ठेकेदारास मुदत वाढ दिली. वास्तविक गेली दोन महिन्यांपासून कामगार पगारापासून वंचित आहेत. 75 कामगार विविध विभागात काम करत आहेत.

रोजंदारीप्रमाणे काम असल्याने आता ऐन सणासुदीला पैशाची निकड असतानाही हातात हक्‍काचा पगार नाही. यामुळे पैशावाचून कामगार हवालदिल झाले. पगार नसल्याने खर्च कोठून कसा करायचा हीच भ्रांत कर्मचाऱ्यांना आहे. यामुळे किमान दसऱ्यापूर्वी तरी पालिका आणि ठेकेदार पगार करेल का? अशी विचारणा होत आहे.

नगराध्यक्षा उमरगेकर म्हणाल्या की…
नव्याने मागविण्यात आलेल्या निविदांना मंजुरी नसल्याने जुन्याच ठेकेदाराला प्रशासनाने परस्पर मंजूरी दिली. वास्तविक पालिकेने पैसे अदा केले नाही, तरी किमान तीन महिन्यांचा पगार कामगारांना वेळेत देणे ठेकेदारासाठी बंधनकारक आहे. मात्र, ठेकेदार एक महिन्याचा पगारही वेळेत देत नाही. माझ्याकडेही कामगारांच्या तक्रारी आल्या. यामुळे लवकरात लवकर वेतन करण्यासाठी ठेकेदाराला भाग पाडू. अन्यथा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सर्व सभासदांच्या सहकाऱ्याने केली जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.