वडगाव मावळ – स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून मावळच्या मातीशी माझे नाते आहे,असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात आयोजित केलेल्या मावळ फेस्टीव्हल सोहळ्याचे उद्घाटन कृषिमंत्री मुंडे यांच्या हस्ते व आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, भंडारा डोंगर ट्रस्टचे बाळासाहेब काशीद, गणेशआप्पा ढोरे, बाबुराव वायकर, भास्करराव म्हाळसकर, रवींद्र भेगडे, गणेश खांडगे, अमोल बुचडे, मयूर ढोरे, विलास काळोखे, सुनील ढोरे, मुख्याधिकारी प्रवीण निकम, फेस्टिव्हलचे संस्थापक प्रवीण चव्हाण, सुरेश जांभूळकर, कार्यक्रम प्रमुख विनायक भेगडे आदी उपस्थित होते.
कृषिमंत्री मुंडे म्हणाले की, संस्कृतीचा वारसा जपत आपल्या मातीतील उल्लेखनीय कार्य करण्याच्या पाठीवर थाप टाकण्याचे काम मावळ फेस्टीव्हल वर्षानुवर्षे करतेय, ही अभिमानास्पद बाब आहे. आमच्या बीड जिल्ह्यातील लोक नोकरीनिमित्ताने मावळात राहतात याचाही मला अभिमान आहे. मावळच्या विकासात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही मोठ योगदान आहे, असा उल्लेख करत आमदार शेळके यांच्या माध्यमातून अजित पवारांनी मावळसाठी भरभरून निधी दिल्याचे सांगितले.
आमदार शेळके म्हणाले की, वडगाव शहर क्रीडा व सांस्कृतिक भूमी म्हणून ओळखले जाते. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे काम करणे आवश्यक आहे आणि हे फक्त मावळ फेस्टिवलच्या मंचावर दिसते.
विविध पुरस्काराचे वितरण
मावळ फेस्टिवलला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातूनही प्रेक्षक या फेस्टिवलला हजेरी लावत आहे. विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीतही प्रेक्षक कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत थांबतात.
विविध पुरस्काराचे वितरण
याप्रसंगी श्रीराम कला नाट्य मंडळ, पवळेवाडी यांना जीवनगौरव, श्री एकवीरा जोगेश्वरी दुर्गा परमेश्वरी ट्रस्ट सामुदायिक विवाह सोहळा समितीला सामाजिक व बैलगाडा शर्यतीत नावलौकिक मिळवलेल्या ‘ओम्या’ बैलाला विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर ’करून गेलो गाव’ या विनोदी नाटकाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.