कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करणार
पुणे – महापालिकेचे सर्व पत्रव्यवहार तसेच दैनंदिन कामकाज मराठी भाषेतूनच करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत. शासकीय कामकाजात मराठीचा वापर अनिवार्य असल्याचे आदेश राज्यशासनाने दि.20 जून रोजी काढले होते. त्याची अंमलबजावणी आता महापालिकाही करणार आहे.
…तर वेतनवाढ रोखणार
जे अधिकारी अथवा कर्मचारी कामकाज मराठीत करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने त्यांना लेखी ताकीद देणे, त्यांच्या गोपनिय अहवालात नोंद करणे, ठपका ठेवणे तसेच एका वर्षासाठी पुढील वेतनवाढ रोखणे अशा कारवाईचा समावेश आहे.
अशी करणार अंमलबजावणी
सर्व पत्रव्यवहार, संकेतस्थळे, टिप्पण्या, परिपत्रके, पत्रावरील आद्याक्षरे, अर्ज मराठीतच
नैसर्गिक आपत्ती त्या बाबतच्या उपाययोजना तसेच सर्व क्षेत्रांतील माहिती नागरिकांना मराठीतच
महापालिकेच्या वेगवेगळया विभागाच्या नोटीस, नमुने, दंडाच्या पावत्या मराठीतच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, जाहिराती, घोषवाक्य मराठीत अनुवादित करण्यात येणार आहेत. यातून मराठी वापराला प्रोत्साहन मिळेल.