मुस्लिम मतदारांनी एकगठ्ठा मतदान करून मोदींना पाडावे – सिद्धू 

पाटणा – माजी क्रिकेटपटू तथा काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर बिहार येथील कटिहार येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना नवजोत सिंग सिद्धू यांनी कटिहार लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम मतदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यासाठी मोदींविरोधात एकगठ्ठा मतदान करण्याचे आवाहन केले.
काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री तारिक अन्वर यांच्या प्रचारार्थ सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या या सभेमध्ये बोलतानाचा सिद्धू यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सत्ताधारी भाजपकडून नवजोत सिंग सिद्धू यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
“एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास असा नारा देऊन भारताच्या विकासासाठी आहोरात्र झटत असतानाच विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून अशा प्रकारचे जातीयतावादी राजकारण केले जात आहे.” अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मतदान करण्याचा सल्ला मुस्लिम मतदारांना देताना सिद्धू म्हणतात, “तुम्ही अल्पसंख्यांक आहेत असा विचार करण्याची गरज नाही कारण तुमची कटिहार लोकसभा मतदारसंघामधील संख्या ६२% आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मोदींविरोधात एकगठ्ठा मतदान करून त्यांना पाडायला हवे.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.