-दीपक महामुनी
चालणे एक लाभदायक व्यायाम – (भाग 1)
सर्व प्रकारच्या व्यायामातील सर्वोत्तम व्यायाम म्हणजे चालणे. याची कारणे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या साधनांची गरज नाही. त्यासाठी कोणताही खर्च नाही, कोणत्याही वयात तुम्ही तुमच्या सोईनुसार कधीही चालू शकता. पण सकाळची वेळ ही त्यासाठी सर्वांत उत्तम असते.
सकाळी फिरायला जाताना आपण कसे चालायला पाहिजे ते नीट समजून घ्या. व्यायामासाठी चालणे म्हणजे ज्याला शास्त्रीय भाषेत फिटनेस वॉकिंग म्हणतात ते व्हायला हवे. थोड्या वेगात, लयबद्ध रीतीने आणि ज्यात पावलांवर कमी दाब पडतो अशी शारीरिक क्रिया म्हणजे फिटनेस वॉकिग. यातून व्यायाम केल्याचे सर्व फायदे मिळतात. फिटनेस वॉकिंग म्हणजे जोरात पळणे नव्हे किंवा जॉगिंगही नव्हे.
फिटनेस वॉकिंगमुळे हृदयाची गती वाढते. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. चयापचय संस्था सुधारते. शरीरातील कॅलरी खर्च होतात. शिवाय त्यामुळे कोणताही त्रास होण्याची शक्यता नसते. कोणत्याही वयात आपण हा व्यायाम करू शकता. वजन कमी करण्याचा किंवा राखण्याचा हा उत्तम मार्ग आहे. आठवड्यातून तीन ते चार वेळा विशेषतः सकाळी वीस ते तीस मिनिटे न थांबता चालल्यास आरोग्यासाठी उत्तम आहे.
वजन कमी करण्यासाठी फिटनेस वॉकिंग अतिशय फायदेशीर आहे. वजन जास्त आहे आणि चालण्याचा वेगही जास्त आहे, अशा परिस्थितीत स्वाभाविकपणे जास्त कॅलरी खर्च होतात. टेकडी किंवा डोंगरवर चढउतार केल्यास कॅलरी खर्च होण्याचे प्रमाण वाढते. पण त्याचवेळी आहारावर नियंत्रण हेही महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. वेगाने चालण्याने पाय, नितंब, पोटाच्या पेशींना ताकद मिळते. त्यामुळे चरबी कमी होते.
चालण्याच्या व्यायामाचे फायदे मोजायचेच झाले तर ते असे…
-एक पैसाही खर्च न करता करता येणारा व्यायाम प्रकार
-सर्वांना करण्यासाठी सहज, सोपा व्यायाम प्रकार
-कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार
-शरीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार
-सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सीजन चा शरीराला पुरवठा होतो.
-हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळ्च्या कोवळ्या ऊन्हातून मिळते.
-चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
-सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
-चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत
-चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
-मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
-चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
-दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे.
-चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात.
-झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो .
-नियमित चालणारयांची फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
-नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
-हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
-नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात
-नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
-चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
-नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.