नांदेडमध्ये साधूसह दोघांची हत्या

मठात चोरी करण्याच्या उद्देशातून प्रकार घडल्याचा संशय

नांदेड: उमरी तालुक्‍यातील नागठाणा येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यात एका साधूचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला आणि त्यानंतर गळा दाबून खून केल्याची माहिती समोर आली आहे.

उमरी तालुक्‍यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतिनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून करण्यात आला. त्याच मठातील स्वच्छतागृहामध्ये अन्य एक मृतदेह आढळला. मयताचे नाव भगवान शिंदे असे असून ते मठापतीचे सेवेकरी होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साईनाथ लिंगाडे याने काल रात्री 12 च्या सुमारास गावातील जिल्हा परिषद शाळा परिसरात भगवान शिंदे यांची हत्या केली. त्यानंतर आरोपी मठात गेला आणि त्याने महाराजांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर नगदी रक्‍कम लॅपटॉप चोरी केली.

महाराजांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. पण मठाच्या बाहेर गाडी काढताना ती गेटला धडकली. गाडीचा आवाज झाल्याने गावकरी जागे झाले. यामुळे आरोपी दुचाकीवरून फरार झाला. यानंतर नागरिकांना महाराजांचा मृतदेह आणि ऐवज गाडीत आढळला, अशी माहिती पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी दिली.

या प्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी साईनाथ लिंगाडेला तेलंगणातील तानुर या गावातून पोलिसांनी अटक केली आहे.

दररम्यान, आरोपी विरोधात गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र, उमरी पोलिसांनी या तक्रारीला गंभीरपणे घेतले नव्हते. आरोपीला मोकाट सोडल्याने हत्याकांड झाल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.