लॉकडाऊन खेळाडूंसाठी फायद्याचे – राहुल द्रविड

बेंगळुरू – करोनामुळे सध्या देशात लॉकडाऊन आहे. गेल्या मार्च महिन्यापासून खेळाडू आपापल्या घरातच आहेत. ही परिस्थिती निराशाजनक असली तरीही सकारात्मकतेने पाहिले तर हा वेळ खेळाडूंसाठी फायद्याचाच ठरेल, असे मत माजी कसोटीपटू व राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक राहुल द्रविड यांनी व्यक्‍त केले आहे.

मार्चपासून करोना जगभर पसरला. त्याचा क्रीडा क्षेत्रालादेखील मोठा फटका बसलेला आहे. सर्व स्पर्धा लांबणीवर टाकल्या गेल्या असून काही स्पर्धा यंदा रद्दच करण्यात आल्या आहेत. केवळ क्रिकेटपटूच नव्हे तर सर्वच क्रीडापटूंना आपापल्या घरातच राहावे लागत आहे. या काळात मानसिक नैराश्‍यदेखील येते. मात्र, सकारात्मकतेने विचार केला तर हा मिळालेला वेळ खेळाडूंना खूप फायदेशीर ठरेल, असेही द्रविडने सांगितले.

सामने व स्पर्धा सातत्याने सुरू असताना या खेळाडूंना आपल्या परिवाराला वेळच देता येत नाही. त्यांना दोन मालिकांमध्ये तसेच स्पर्धांमध्ये विश्रांतीदेखील मिळत नाही. ज्या खेळाडूंना संघातील स्थान धोक्‍यात आल्याची भीती असते ते खेळाडू दुखापत झाल्याचेही लपवून ठेवतात.

आज क्रिकेटच्या बरोबरीने सर्वच खेळात प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे हा जबरदस्तीने मिळालेला वेळ त्यांना नवी उभारी देणारा ठरेल, असेही द्रविड म्हणाला.

कारकीर्द लांबेल…

खेळाडूंना या काळात मिळत असलेली विश्रांती त्यांच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यामुळे ते ताजेतवाने होतील व आगामी स्पर्धांमध्ये सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसतील. त्यामुळे खरेतर त्यांची कारकीर्द जास्त काळ वाढेल, असेही द्रविड यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.