पुणेः बारा तासात पुणे शहरात दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत. लाॅकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथील होताच शहरातील गुन्हेगारीने परत डोके वरती काढल्याचे दिसून येते.
सोमवारी रात्री साडे आठ वाजता येरवडा परिसरात प्रतिक हनुमंत वन्नाळे (वय.28,रा. पंचशीलनगर येरवडा) या केटरींग व्यावसायिक तरुणाचा किरकोळ भांडणातून कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना ताजी असतानाच, मंगळवारी सकाळी साडे आठच्या दरम्यान हडपसर येथील गंगानगर स्माशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकाचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. बसवराज उर्फ बशा बलभिम कांबळे असे खून झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिड महिन्यापुर्वी गंगानगर परिसरात एका व्यक्तीचा खून झाला होता. त्या खूनामध्ये बसवराज उर्फ बशाचा हात असल्याचा संशय काही जणांना होता. त्यातूनच त्यांच्यात पुर्ववैमन्स सुरू झाले होते. याच कारणातून त्याचा सहा ते सात जणांनी कोयत्याने वार करून खून केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच बशावर यापुर्वी देखील काही गुन्हे हडपसर पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.