पिंपरी – लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी देवकर वस्ती, भोसरी येथे घडली.
राजेश शंकर पवार (वय 27, रा. देवकर वस्ती, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गायकवाड आणि त्याची आई (पूर्ण नाव माहिती नाही) अशी संशयीत आरोपींची नावे असून, सध्या ते पळून गेले आहेत.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास लहान मुलांची भांडणे झाली. त्या भांडणामध्ये मोठ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणांमध्येही भांडणे झाली. आरोपी गायकवाड आणि त्याच्या आईने राजेश पवार यास ढकलून दिल्याने तो जमिनीवर पडला. त्याला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेनंतर आरोपी गायकवाड आणि त्याची आई पळून गेले आहेत. आरोपी आणि मयत हे दौंड तालुक्यातील आहेत. ते नंदीबैलवाल्याचे काम करतात. सध्या ते भोसरीतील देवकर वस्ती येथे पाल टाकून राहत आहेत.