सातारा : पडळ (ता .खटाव) येथील खटाव-माण शुगर या साखर कारखान्यावर झालेल्या मारहाणीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साखर चोरीचा आळ असल्याने संबंधित कामगाराला मारहाण झाल्याची चर्चा आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पडळ येथील खटाव-माण शुगर या साखर कारखान्यातील गोडाऊन किपर, मॅनेजर व इतर काही जण कारखान्यातील तयार झालेली साखर परस्पर विकत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यानंतर बुधवारी मृत कर्मचारी व इतर कामगारांना काही लोकांनी चोरीबाबत विचारणा केली.
दरम्यान त्यांच्यात झालेल्या वादानंतर मृत कामगाराला मारहाण झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, साहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, पीएसआय शीतल पालेकर यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलीस या घटेनचा अधिक तपास करत आहेत.