वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंद्रनील पाटील यांची माहिती
पवनानगर -पवनमावळ परिसरातील कडधे येथे एकाच कुटुंबातील चौघांना करोना विषाणूची बाधा झाली आहे. घरातील चार सदस्य करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. इंद्रनील पाटील यांनी दिली.
वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कडधे येथील बुधवारी (दि. 10) 38 वर्षीय महिला सर्दी व खोकल्याचा त्रास होत होता. या कारणाने महिलेला ग्रामीण रुग्णालय काले कॉलनी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना त्यांची कोविड 19 ची चाचणी केली. या चाचणीमध्ये सबंधित महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यानंतर महिलेच्या घरातील अन्य सदस्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अन्य तीन सदस्यांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
कडधे गावातील “पॉझिटिव्ह’ व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींनी आपली करोना चाचणी करावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कडधे गावाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या ठिकाणी “पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळले आहेत. तसेच त्या ठिकाणी “मायक्रो कंटेन्मेन्ट झोन’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सॅनिटायझरचा वापर करावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
बाजारपेठेत विनामास्क फिरताहेत नागरिक
पवनानगर बाजारपेठेपासून काही अंतरावर असलेल्या कडधे गावात एकाच घरातील चार करोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या आहेत. तरी पवनानगर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी कमी करावी, फिजिकल डिस्टंन्सचा अवलंब करावा. मात्र बहुतेक नागरिक, ग्राहक बाजारपेठेत विनामास्क फिरताना दिसत आहे. त्यामुळे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच करोना संसर्ग वाढणार नाही, म्हणून प्रशासनाने खबरदारी घ्यावी.
गावात एकाच कुटुंबातील चार सदस्यांना करोनाची बाधा झाली आहे. आता ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृती करीत आहोत. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी विलगीकरणात राहावे. काही लक्षणे आढळल्यास आपली कोविड चाचणी करुन घ्यावी.
– कुसूम संजय केदारी, सरपंच, कडधे.