पुणे- तीन वर्षांच्या मुलीला मारहाण करत भिंतीवर डोके आपटून तिचा खून करण्यात आला. ही घटना आंबेगाव बु. येथे श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत सावत्र बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. त्यानुसार जितेंद्र उत्तम पाटील (33) यास अटक करण्यात आली आहे. तो खासगी वाहनचालक आहे. फिर्यादी महिला आणि जितेंद्रचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. “ती घटस्फोटीत असून, तिला तीन वर्षांची मुलगी आहे,’ असे सांगण्यात आले होते. मात्र, पत्नी घटस्फोटीत नसून मुलगी अनैतिक संबंधातून जन्मल्याचे जितेंद्रला समजले. यामुळे तो मुलीचा राग करत होता. त्याने 13 एप्रिल रोजी रात्री मुलीला मारहाण करत जखमी केले होते. यानंतर पुन्हा 15 एप्रिल रोजी मुलगी झोपली असता तिला पुन्हा मारहाण करत भिंतीवर आपटून जिवे ठार मारले. मुलगी निपचित पडल्यावर आईने धावाधाव करत तिला रुग्णालयात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदन अहवालात मुलीला मारहाण केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, फिर्यादी महिलेचे पुण्यात कोणीच नातेवाईक नाहीत. यामुळे मुलीला पती मारहाण करत असल्याने ती घाबरली होती. यानंतर पोलिसांनी तिला विश्वासात घेतल्यावर खरी घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर करत आहेत.