पिंपरी – आधी हॉटेलमध्ये सर्वांनी सोबत जेवण केले आणि नंतर किरकोळ कारणावरून मित्रांनीच तरुणाचा खून केला. ही घटना भोसरी येथे रविवारी (दि. 3) दुपारी घडली. अतीक सय्यद (वय 27, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळगाव बुलढाणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतीक हा ड्रेनेजचे काम करीत होता. रविवारी एका मित्राचा वाढदिवस असल्याने सर्व मित्र दुपारी हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. सर्वांनी सोबत जेवणही केले. परंतु त्यानंतर बाहेर आल्यावर दारुच्या नशेत त्यांच्यात आपापसात भांडणे सुरू झाली. त्यानंतर चार जणांनी अतीक याच्यावर हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अतिक यास रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलीस निरीक्षक जितेंद कदम यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून उर्वरित आणखी एकाचा शोध सुरू आहे.