पुणे – पुण्यातील कोथरुड परिसरात इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या बालकाचे अपहरण करून निर्घृण खून 13 वर्षाच्या मुलानेच दृश्यम चित्रपट पाहून त्यातून केल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावले आहेत. त्याने मोबाईलवर हा सिनेमा वारंवार बघून खूनाचा कट रचला. आपल्यापेक्षा कोणीही मोठा नसल्याच्या भावनेतून हा खून केल्याची कबुली दिली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने तपास यंत्रणांनाही तब्बल तीन दिवस चालाखीने उत्तरे देत गुंगारा दिला होता.
विश्वजित उर्फ विशु विनोद वंजारी ( वय 11, रा. केळेवाडी, कोथरूड) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. तो शुक्रवारपासून बेपत्ता होता. त्याचा रविवारी मृतदेह सापडल्यामुळे खळबळ माजली. विश्वजीतचा मृतदेह मेट्रो कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत राडारोड्यामध्ये पुरला होता. त्याच्या डोक्यावर वार करण्यात आल्याच्या खुणा होत्या.
विधीसंवर्गीत मुलाची आई खासगी कंपनीत क्लार्क तर वडील वाहनचालक आहेत. लहानपणापासून त्याची वर्तवणूक चुकीची होती. त्याला आजवर तीन शाळांमधून काढून टाकण्यात आले होते. त्याच्या मनामध्ये नेहमी श्रेष्ठत्वाची भावना असायची. आपल्यापेक्षा इतर कोणीही मोठे नाही आणि आपले सगळ्यांनी ऐकलेच पाहिजे असा त्याचा हट्ट असे. खेळताना त्याच्यावरच नेहमी डाव येत असल्याचाही राग त्याच्या मनात होता. विश्वजीतला माझे तु ऐकले नाहीस तर परिणाम वाईट होतील असा दम देत होता.
त्याने काही दिवसांपुर्वीच दृश्यम हा सिनेमा मोबाईलवर डाऊन लोड केला. तो सीनेमा वारंवार बघत असे. यातूनच त्याने विश्वजीतच्या खूनाचा कट आखला. त्याने विश्वजीतला खेळता खेळता राडा रोडा असलेल्या मैदानावर नेले होते. तेथे त्याच्या डोक्यात कठीण वस्तूने घाव करुन त्याचा खून केला. यानंतर त्याचा मृतदेह राडा रोड्यात पुरला.
पोलिसांना पहिल्या दिवसापासूनच विश्वजीतचा मित्र असलेल्या 13 वर्षीय विधिसंवर्गीत मुलावर संशय होता. त्याला ताब्यात घेऊन गुन्हे शाखा व कोथरुड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली होती. मात्र तो इतका चालाख होता की, त्याने उत्तरे देताना आपण गुन्हा केल्याचा थांगपत्ताही तब्बल तीन दिवस पोलिसांना लागून दिला नाही. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला पोलिशी खाक्या दाखवता येणेही शक्य नव्हते. मात्र पोलिस यंत्रणेने त्याच्याशी गोड बोलून सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती करत एका क्षणी त्याच्याकडून गुन्हा केल्याचे काढून घेतल्याची माहिती पोलीस यंत्रणेने दिली.