कापूरहोळ -शिवरे (ता. भोर) गावच्या हद्दीत एका नामांकित कंपनीच्या समोरील गेटमध्ये सोमवारी (दि. 6) रात्री सव्वाआठच्या सुमारास एकावर चार जणांनी लोखंडी कोयत्याने वार करत निर्घृण हत्या केली. प्रवीण सत्यवान मोरे (वय 25, मूळ रा. वाण्याची वाडी ता. खंडाळा; सध्या शिवरे, ता. भोर) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. तो पॅरोलच्या सुट्टीवीर आला होता.
याप्रकरणी दशरथ तुकाराम डिंबळे यांनी राजगड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 7) फिर्याद दिली. याबाबतची माहिती अशी की, जुन्या भांडणाच्या कारणावरून दत्ता उर्फ चिक्या पुरुषोत्तम लेकावळे, महेश पुरुषोत्तम लेकावळे व इतर त्याचे दोन अनोळखी साथीदार (नाव पत्ता माहीत नाही) यांनी हातात कोयते घेऊन येऊन प्रवीणवर वार करून त्यास जीवे ठार मारले. भांडणे सोडवण्यास दशरथ डिंबळे गेले असता त्यांनाही आरोपींनी हातावर कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.
प्रवीण मोरे होता पॅरोल सुट्टीवर
हत्या झालेला प्रवीण मोरे हा 2017 मध्ये खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याने विराज भिलारे नावाच्या व्यक्तीचा खून केला होता. तो सध्या येरवडा कारागृहात होता. 3 जून रोजी येरवडा कारागृहातून 45 दिवसांच्या पॅरोलवर सुटलेला होता. तो शिवरे या गावात राहण्यास होता. त्यामुळे हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.