पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेणाऱ्या चिखली येथील पावडर कोटिंग कंपनीला पर्यावरण विभागाने नोटीस बजावली आहे. उद्योग व्यवसायासाठी आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात, तोपर्यंत कंपनी बंद ठेवावी, असा आदेश पर्यावरण विभागाकडून देण्यात आला आहे.
पावडरने कोटिंग करणाऱ्या कंपनीमुळे चिखलीतील पवारवस्ती येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. रात्रंदिवस कंपनी सुरुच राहत असल्याने कंपनीच्या खिडकीद्वारे काळी विषारी पावडर बाहेर फेकली जाते.
परिसरातील नागरिकांच्या नाकातोंडातून ही पावडर शहरिरात जात असल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर परिसरात वायू प्रदुषण होत असून रस्त्यावरील वाहनांचालकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गुरुकृपा कोटस कंपनीला महापालिका पर्यावरण विभागातील कर्मचाऱ्यांनी भेट दिली.
कंपनीने महापालिकेच्या पर्यावरण आणि उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी कोणताही परवानगी, ‘ना हरकत’ प्रमाणपत्र घेतले नसल्याची बाब समोर आली. महापालिकेने कंपनीला नोटीस बजावली आहे. आस्थापना बंद ठेवण्यात यावे. शासनाने निर्धारित केलेल्या आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेणे अनिवार्य राहणार आहे. आस्थापनेतून निर्माण होणारी काजळी वातावरणात मिसळणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात. अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
काळी कोटिंग पावडर हवेत सोडून वातावरणात प्रदुषण करणा-या कंपनीला नोटीस बजाली आहे. कंपनीने शासनाची योग्य त्या परवानगी घ्यावी, कोटिंग पावडरवर उपाययोजना करावी. सात दिवसांत कंपनीकडून खुलासा मागविला आहे. पुढील कार्यवाहीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पाठवले आहे.- संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता, पर्यावरण विभाग