पुणे –ससून रुग्णालयात नव्या वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती या आठवडयात करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिली.
एका खासगी रुग्णालयात केलेल्या किडनी प्रत्यारोपण प्रकरणात तस्करी असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या प्रकरणात विभागीय प्रत्यारोपण समितीचे डॉ. अजय तावरे यांच्याकडून अधीक्षक पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. याशिवाय त्यांची चौकशीही सुरू आहे.
त्यानंतर त्याचा पदभार हा उपअधीक्षक डॉ. विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त आणि संचालक यांच्याकडून रुग्णालयाच्या नव्या वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
त्यासाठी त्यांनी ससून रुग्णालयाकडून अनुभवी प्राध्यापकांची नावेही मागितली होती. नावे पाठवलेल्यांमधूनही कोणी प्रभावी अधिकारी न मिळाल्यास इतर अधिकात्यांची देखील नियुक्ती केली जाऊ शकते, असेही डॉ. म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. ससून रुग्णालय प्रशासनाने अधीक्षक पदासाठी पाच प्राध्यापकांची नावे संबंधितांकडे पाठवली आहेत. वरिष्ठ स्तरावरूनच ही नियुक्ती होईल, असे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी सांगितले.