स्मार्ट सिटी राबविणार प्रकल्प : स्वतंत्र संगणक यंत्रणा विकसित होणार
पुणे – महापालिकेची शहरातील रुग्णालये, दवाखाने तसेच प्रसृतीगृहे लवकरच पेपरलेस होणार आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून महापालिका रुग्णालयांसाठी स्वतंत्र संगणक यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठीची बैठक नुकतीच महापालिकेत झाल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे यांनी दिली.
महापालिकेची शहरात सुमारे 70 दवाखाने, प्रसृतीगृहे तसेच रुग्णालये आहेत. त्याचे दैनंदिन कामकाज अद्यापही संगणकाच्या माध्यमातून होत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाची एकत्र माहिती कोठेही उपलब्ध नाही. रुग्णालयाकडून माहिती मागविल्यानंतरच एकत्रित स्वरुपात या माहितीचे संकलन करण्यात येते. त्यामुळे या माहितीचे संगणकाच्या माध्यातून संगणकीकरण होण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पालिकेच्या रुग्णालयांसाठी हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम राबविण्यात येणार आहे.
काय होणार बदल
या संगणकप्रणालीनुसार, महापालिकेत येणाऱ्या रुग्णांची माहितीची नोंद ऑनलाइन स्वरुपात असेल, तसेच प्रत्येक रुग्णांच्या उपचाराची माहितीही स्वतंत्रपणे संगणकावर नोंद केली जाईल. याशिवाय, रुग्णास दिली जाणारी औषधे, रुग्णालयातून करण्यात आलेल्या औषधांचे वाटप ही माहितीही एकत्रित स्वरुपात ऑनलाइन संकलीत केली जाईल. त्यामुळे कोणत्याही रुग्णालयात कागदाचा नोंदीसाठी वापर केला जाणार नाही. परिणामी नेमके किती रूग्ण पालिकेच्या रुग्णालयात प्रत्येक दिवसाला उपचार घेतात, रुग्णांच्या आजारांचे वर्गीकरण, औषधांची नेमकी माहिती, रुग्णांचा वयोगट अशा प्रकारची माहिती पालिकेला एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच, रुग्णाला आपल्या उपचाराची माहितीही स्वत: जवळ ठेवायची वेळ येणार नसल्याचे साबणे यांनी स्पष्ट केले.