पुणे : महापालिकेच्या प्रभाग रचना नियमबाह्य आणि राजकीय हस्तक्षेप करून मोठया प्रमाणात तोडफोड करून केली गेली असल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच, या प्रभाग रचनेवरून राष्ट्रवादी वगळता सर्वच राजकीय पक्षांनी नियमबाह्य प्रभाग रचनेचा आरोप करत विरोध केला असतानाच; निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेच्या हरकती सुचनांच्या सुनावणीसाठी शिस्तप्रिय, कडक, राजकीय दबावाला न जुमानता नियमानुसार कामकाज करणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामुळे, हरकती आणि सूचनांची सुनावनी अधिक निपक्ष: होऊन प्रभाग रचनेत चुकीचे कामकाज झाले असल्यास ते रद्द होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, 14 फेब्रुवारी पर्यंत हरकती नोंदविता येणार असून या आदेशानुसार, 24 जानेवारी रोजी ही सुनावणी होणार आहे. तसेच या सुनावनीवेळी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी यांच्या समक्ष अथवा आयुक्त नसल्यास उपायुक्त दर्जाच्या समकक्ष अधिकाऱ्याच्या उपस्थित घ्यायची असून निवडणूक आयोगास त्याचा अहवाल 2 मार्च पर्यंत सादर करायचा आहे.
आतापर्यंत 17 हरकती दाखल….
महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत मोठया प्रमाणात तोडफोड तसेच फेरबदल झाल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच त्याच वेळी प्रभाग रचनेवर पहिल्या दोन दिवसात अवघ्या 17 हरकती दाखल झालेल्या आहेत. त्यात, 6 हरकती पहिल्या दिवशी तर 11 हरकती गुरूवारी दाखल करण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.