वाघोली : नऊ मीटर पेक्षा जास्त रुंदी असणाऱ्या वाघोली-लोहगाव रोडवर पडलेले खड्डे तसेच केसनंद फाटा येथील बीआरटी टर्मिनल समोर पडलेले खड्डे बुजविण्यात यावे अशी लेखी मागणी
श्री शिवछत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली आहे. कुलकर्णी यांनी संबंधितांना तात्काळ आदेश देतो असे आश्वासन यावेळी दिले.
वाघोली गावातील नऊ मीटर पेक्षा जास्त रुंदी असणाऱ्या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. यामध्ये वाघोली-लोहगाव रोड, बीआरटी टर्मिनल समोरील केसनंद रोड यांचा समावेश आहे.
पीडब्ल्यूडी कडून रस्ता दुरुस्तीसाठी आश्वासन देण्यात आले आहे परंतु वाघोली गाव पुणे महानगरपालिकेत समावेश झाल्यामुळे महानगर पालिकेचा पथ विभाग देखील याची दुरुस्ती करू शकतो.
त्याचाच एक भाग नऊ मीटर पेक्षा कमी असलेले अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती श्री शिवछत्रपती प्रतिष्ठाणच्या पाठपुराव्याने चालू झाली आहे. परंतु नऊ मीटर पेक्षा अधिक असलेले रस्ते संबंधित शाखा अभियंता मटेरियल कमतरतेचे कारण पुढे करून रस्ता दुरुस्तीसाठी तयार होत नव्हते.
संबंधित तक्रार श्री शिवछत्रपती प्रतिष्ठाणच्या वतीने महापालिका पथ विभागाचे मुख्य अभियंता विजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली असून त्यांनी तात्काळ यासंबंधी आदेश देतो असे आश्वासन दिले असल्याचे कल्पेश जाचक, शिवदास पवार यांनी सांगितले.